ठाणे
सोशल मीडियाचा गैरवापर किती धोकादायक ठरू शकतो, याचे गंभीर उदाहरण ठाणे जिल्ह्यात समोर आले आहे. इंस्टाग्रामवरील बनावट प्रोफाइलच्या माध्यमातून 15 वर्षीय विद्यार्थ्याला जाळ्यात ओढून त्याचे अपहरण करण्यात आले. मात्र ठाणे पोलिसांच्या जलद कारवाईमुळे अवघ्या 24 तासांत मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पीडित मुलगा दहावीचा विद्यार्थी असून तो नवी मुंबई परिसरात राहतो. आरोपींनी एका तरुणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून त्याच्याशी संवाद सुरू केला. काही दिवस चॅटिंग करून विश्वास संपादन केल्यानंतर त्याला कल्याण पूर्व येथील नंदिवली परिसरात भेटण्यासाठी बोलावण्यात आले.
मुलगा कॅबने ठरलेल्या ठिकाणी पोहोचताच, आधीच दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याचे अपहरण केले व एका खोलीत डांबून ठेवले.
अपहरणानंतर आरोपींनी मुलाच्या कुटुंबीयांकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागितली. व्हॉट्सॲपवर व्हॉईस मेसेज पाठवून दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मुलगा अचानक संपर्कात न आल्याने पालकांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, कॅबची माहिती आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास सुरू केला. अवघ्या 24 तासांत ठिकाण निश्चित करून धाड टाकण्यात आली आणि मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली.
या प्रकरणी पोलिसांनी प्रदीप कुमार जैस्वाल (24), विशाल पासी (19), चंदन मौर्य (19) आणि सत्यम यादव (19) या चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींविरोधात अपहरण व खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही घटना अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी असून, पालकांनी मुलांच्या ऑनलाइन वापरावर विशेष लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

