भंडारा : जिल्ह्यातील कोरंभी उड्डाणपूलावर पहाटे घडलेल्या दरोड्याच्या थरारक घटनेत पोलिसांनी जलद आणि प्रभावी कारवाई करत अवघ्या १२ तासांत तब्बल १२ आरोपींना अटक केली आहे. ट्रक अडवून चालकाला मारहाण करत १५ हजार रुपयांची लूट करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी छडा लावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास काही तरुणांनी कोरंभी उड्डाणपूलावर ट्रक थांबवून चालकावर लाकडी दांड्यांनी हल्ला केला. यानंतर त्याच्याकडील रोख रक्कम हिसकावून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे नागपूर व भंडारा येथील तरुणांचा समावेश असलेल्या टोळीला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून लूट केलेली रक्कम व हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, या आरोपींचा इतर गुन्ह्यांशी संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत असून, जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी कडक कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
