गोंदिया | प्रतिनिधी
गोंदिया नगरपरिषद 2025 च्या निवडणुकीत मतमोजणी सुरू असून, आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांनुसार विविध प्रभागांमधून विजयी उमेदवारांची नावे समोर आली आहेत. पहिल्या टप्प्यातील निकालांत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच बहुजन समाज पक्षाने आपले खाते उघडले आहे.
प्रभाग क्रमांक 1 मध्ये काँग्रेसच्या अमर रंगारी आणि ज्योती फूडे यांनी विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये राष्ट्रवादीच्या नीती विनोद रॉय तर काँग्रेसचे चंद्रकुमार चूटे विजयी झाले आहेत. भाजपने प्रभाग क्रमांक 3, 5 आणि 6 मध्ये दमदार कामगिरी करत एकापेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला आहे.
प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजपच्या मैथुला बिसेन यांच्यासह राष्ट्रवादीचे राज शुक्ला विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 7 मध्ये राष्ट्रवादीच्या कल्पना बनसोड तर भाजपचे शिव शर्मा विजयी ठरले. प्रभाग क्रमांक 8 मध्ये बहुजन समाज पक्षाच्या स्नेहा गडपायले आणि सुनील भरणे यांनी बाजी मारली आहे.
आतापर्यंतच्या निकालांवरून गोंदिया नगरपरिषदेत बहुपक्षीय चित्र स्पष्ट होत असून, पुढील फेऱ्यांतील निकालांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उर्वरित प्रभागांचे निकाल जाहीर होताच चित्र आणखी स्पष्ट होणार आहे.

