भंडारा : नगरपरिषदेच्या निवडणुकीत यंदा राजकीय वर्चस्वाची चुरशीची लढत पाहायला मिळाली. आमदार परिणय फुके आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यातील संघर्षामुळे ही निवडणूक जिल्हाभर चर्चेचा विषय ठरली होती. महायुतीत मित्रपक्ष असतानाही दोन्ही नेत्यांनी स्वतंत्र ताकदीवर निवडणुकीला सामोरे जात आपापले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
निकाल जाहीर होताच या संघर्षात आमदार परिणय फुके यांचे पारडे जड ठरल्याचे स्पष्ट झाले. भंडारा नगरपरिषदेत विद्यमान आमदारांचा दबाव झुगारत मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला नगराध्यक्षपदी निवडून दिले. यामुळे स्थानिक पातळीवर मतदारांनी घेतलेला स्वतंत्र निर्णय अधोरेखित झाला आहे. या निकालामुळे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना पराभवाचा सामना करावा लागला असून, त्यांच्या राजकीय प्रभावाला धक्का बसल्याची चर्चा आहे.
जिल्ह्यातील चार नगरपरिषदांचे निकाल एकाच वेळी जाहीर झाले असून, त्यांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. भाजपने चारपैकी दोन नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्ष पद पटकावले, तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका ठिकाणी यश मिळाले. एका नगरपरिषदेत अपक्ष उमेदवार विजयी झाला. जिल्ह्यातील एकूण ४८ नगरसेवकांच्या जागांपैकी सर्वाधिक जागा भाजपने जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले.
२ डिसेंबर रोजी भंडारा, तुमसर, पवनी आणि साकोली नगरपरिषदांसाठी मतदान पार पडले होते. नगराध्यक्ष आणि सुमारे १०० नगरसेवकांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले होते. आज मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर काही ठिकाणी अनपेक्षित निकाल समोर आले असून, राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, निवडणूक प्रक्रियेबाबत काही ठिकाणी आक्षेपही नोंदवण्यात आले. मात्र, निकालानंतर प्रतिक्रिया देताना आमदार परिणय फुके यांनी जनतेच्या निर्णयावर विश्वास व्यक्त करत, “भंडाऱ्याच्या विकासासाठी बहुमताच्या बळावर जबाबदारीने काम केले जाईल,” असे स्पष्ट केले. या निकालामुळे भंडारा जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

