भंडारा जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला असून, याच पार्श्वभूमीवर भोजापूर रोडवरील तमन्ना बार अँड रेस्टॉरंटवर मोठी धाड टाकण्यात आली. या कारवाईत दोन एचपी कंपनीचे घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.
जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. तपासादरम्यान संबंधित बारमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या व्यावसायिक वापर होत असल्याचे स्पष्ट झाले.
या कारवाईत एकूण ५,४१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेल मालकासह तीन जणांविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर केल्यास स्फोट व आग लागण्याचा धोका वाढतो, तसेच सामान्य नागरिकांच्या हक्काच्या गॅस पुरवठ्यावरही परिणाम होतो. त्यामुळे अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील इतर हॉटेल्स, बार व खानावळींमध्येही तपासणी मोहीम अधिक तीव्र केली जाणार असून, नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे अन्न व नागरी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

