नवीन वर्ष 2026 ची सुरुवात आजपासून झाली असून, वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात संमिश्र वातावरण पाहायला मिळाले. गुंतवणूकदारांमध्ये उत्साह असला तरी जागतिक बाजारपेठा बंद असल्याने देशांतर्गत बाजारात सावध व्यवहार झाले.
आज भारतीय शेअर बाजार पूर्णपणे खुला होता, मात्र नववर्षाच्या सुट्ट्यांमुळे आशियातील अनेक प्रमुख बाजार बंद होते. जपान आणि दक्षिण कोरियातील शेअर बाजारात आज व्यवहार झाले नाहीत. दुसरीकडे, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी हालचाल दिसून आली असून, 2020 नंतरची सर्वात मोठी वार्षिक घसरण नोंदवण्यात आली आहे.
सेन्सेक्स-निफ्टी सपाट बंद
2026 च्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी बाजारात दिवसभर चढ-उतार सुरू होते. मात्र, अखेरीस दोन्ही प्रमुख निर्देशांक जवळपास स्थिर पातळीवर बंद झाले.
सेन्सेक्स 32 अंकांनी म्हणजेच 0.04 टक्क्यांनी घसरून 85,188.60 वर बंद झाला. तर निफ्टी 16.95 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 26,146.55 या पातळीवर स्थिरावला.
आजच्या व्यवहारात एकूण 2,113 शेअर्समध्ये वाढ झाली, 1,872 शेअर्स घसरले, तर 159 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आला नाही.
निफ्टीतील ईटरनल, एनटीपीसी, बजाज ऑटो, श्रीराम फायनान्स आणि विप्रो हे शेअर्स सर्वाधिक वाढणाऱ्यांमध्ये होते.
तर ITC, बजाज फायनान्स, डॉ. रेड्डीज लॅब्स, ओएनजीसी आणि टाटा कन्झ्युमर या शेअर्सवर विक्रीचा दबाव राहिला.
FMCG आणि फार्मा सेक्टरवर दबाव
आज FMCG क्षेत्रात सर्वाधिक घसरण झाली असून, जवळपास 3 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. फार्मा निर्देशांकही 0.4 टक्क्यांनी खाली आला.
याउलट ऑटो, आयटी, मेटल, पॉवर, टेलिकॉम आणि PSU बँक क्षेत्रात 0.4 ते 1.5 टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली.
बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.3 टक्क्यांनी वाढला, तर स्मॉलकॅप निर्देशांक जवळपास स्थिर राहिला.
आयटी निर्देशांकात तेजी, तंबाखू कंपन्यांना फटका
बीएसई आयटी निर्देशांकात 0.6 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. मात्र, सरकारच्या नव्या एक्साइज ड्युटीमुळे तंबाखू क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स 10 टक्क्यांपर्यंत घसरले.
रेडिंगटनला मोठा GST नोटीस
रेडिंगटन कंपनीला CGST गुरुग्राम कमिश्नरेटकडून ₹148.33 कोटींचा GST डिमांड नोटीस बजावण्यात आला आहे. या नोटीसमध्ये करासोबत व्याज आणि दंडाचाही समावेश असून, तो 2018-19, 2019-20 आणि 2021-22 या आर्थिक वर्षांशी संबंधित आहे.
Vodafone Idea ला दिलासा
वोडाफोन आयडियासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने कंपनीचे AGR थकबाकी ₹87,695 कोटींवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम आता तात्काळ न भरता पुढील 10 वर्षांत हप्त्यांमध्ये भरण्याची परवानगी देण्यात आली आहे.
अदानी पॉवर, इंडस टॉवर्समध्ये तेजी
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. दिवसभरात शेअर सुमारे 6 टक्क्यांनी वाढून ₹151.95 पर्यंत पोहोचला.
तसेच, इंडस टॉवर्सच्या शेअर्समध्येही 8 आठवड्यांतील सर्वात मोठी वाढ नोंदवली गेली असून, शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला.
LPG, PNG आणि जेट फ्युएलमध्ये बदल
नववर्षाच्या पहिल्या दिवशी इंधन दरांमध्येही बदल झाले.
19 किलोच्या कमर्शियल LPG सिलेंडरच्या किमती ₹111 ने वाढवण्यात आल्या आहेत.
तर दिल्ली-NCR मध्ये PNG गॅसच्या दरात कपात करण्यात आली असून, घरगुती ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
याशिवाय, विमान इंधनाच्या किमतींमध्ये मोठी घट झाल्याने एअरलाईन्सच्या खर्चात घट होण्याची शक्यता आहे.

