अड्याळ | प्रतिनिधी
अड्याळ पोलीस ठाणे हद्दीत गोवंश जनावराची बेकायदेशीर कत्तल व विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तातडीची कारवाई करत आरोपीस अटक केली आहे.
या प्रकरणी सुमारे 11 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.प्राप्त माहितीनुसार, दि. 24 डिसेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक अड्याळ पोलीस ठाणे हद्दीत नियमित पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. समता नगर, अड्याळ येथील रोहित शफी शेख (वय 39) हा आपल्या राहत्या घरी गोवंश जनावराची कत्तल करून त्याचे मांस विक्रीसाठी ठेवत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाईचा निर्णय घेतला.
मिळालेल्या खबरेच्या आधारे पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता आरोपीच्या ताब्यातून अंदाजे 50 किलो गोमांस तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले. या कारवाईत एकूण 11,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपीविरोधात अड्याळ पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 390/2025 अंतर्गत महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यातील कलम 5, 5(क), 9, 9(अ) तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम 325 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू असून या प्रकारात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
गोवंश संरक्षणासंदर्भातील कायद्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला असून नागरिकांनी अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

