कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित चॅटबॉट्स वैद्यकीय उपचारांची जागा घेऊ शकत नसले, तरी मानसिक आरोग्याशी संबंधित समाजातील नकारात्मक दृष्टिकोन कमी करण्यासाठी ChatGPT सारखी साधने उपयुक्त ठरू शकतात, असा निष्कर्ष एका नव्या आंतरराष्ट्रीय अभ्यासातून समोर आला आहे.
ऑस्ट्रेलियातील एडिथ कोवन युनिव्हर्सिटी (ECU) येथील संशोधकांनी मानसिक आरोग्यासाठी ChatGPT चा वापर केलेल्या 73 जणांचा अभ्यास केला. या संशोधनात लोक AI चॅटबॉट्सकडे का वळतात, त्यांचा अनुभव कसा असतो आणि त्यामुळे इतरांकडून टीका होईल या भीतीत किती घट होते, याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
समाज काय म्हणेल ? या भीतीत घट
अभ्यासात असे आढळून आले की, ChatGPT उपयोगी असल्याचा विश्वास असलेल्या लोकांमध्ये समाजाकडून नकारात्मक प्रतिक्रिया मिळतील, ही भीती लक्षणीयरीत्या कमी होती. या प्रकारच्या भीतीला तज्ज्ञांच्या भाषेत “anticipated stigma” असे म्हटले जाते.
ECU मधील क्लिनिकल सायकॉलॉजीचे विद्यार्थी स्कॉट हॅना यांनी सांगितले की,
“जेव्हा एखाद्याला वाटते की हे साधन आपल्याला मदत करू शकते, तेव्हा इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतील याची चिंता कमी होते.”
मानसिक आरोग्य आणि कलंकाचे दुष्परिणाम
मानसिक आरोग्याशी जोडलेला कलंक ही एक गंभीर समस्या मानली जाते. यामुळे अनेक जण वेळेवर मदत घेत नाहीत, परिणामी मानसिक त्रास अधिक वाढू शकतो. अभ्यासात self-stigma म्हणजेच स्वतःलाच कमी लेखण्याची भावना, यामुळे आत्मविश्वास घटतो आणि मदत घेण्याची इच्छा कमी होते, यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे.
AI शी संवाद सोपा, पण धोका टाळावा
आज अनेक लोक गोपनीयता आणि सुरक्षिततेसाठी AI चॅटबॉट्सशी खाजगी संवाद साधणे पसंत करत आहेत. प्रत्यक्ष समोर बोलताना संकोच वाटणाऱ्या व्यक्तींना AI सोबत संवाद अधिक सोपा वाटतो.
मात्र संशोधकांनी याबाबत स्पष्ट इशारा दिला आहे.
ChatGPT हे मानसोपचारासाठी तयार करण्यात आलेले साधन नसून, काही वेळा त्यातून मिळणारी माहिती अचूक किंवा योग्य नसेल, अशी शक्यता नाकारता येत नाही.
जबाबदार वापर आणि पुढील अभ्यास आवश्यक
संशोधकांच्या मते, AI आधारित साधने मानसिक आरोग्य सेवांना पूरक स्वरूपात मदत करू शकतात, मात्र त्यांचा वापर विचारपूर्वक आणि जबाबदारीने करणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात AI मानसिक आरोग्य क्षेत्रात सुरक्षितपणे कसा वापरता येईल, यासाठी अधिक व्यापक आणि सखोल संशोधनाची गरज असल्याचेही अभ्यासकांनी नमूद केले आहे.

