गोंदिया पब्लिक स्कूल, लाखांदूर येथे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
लाखांदूर | प्रतिनिधी :
शिक्षक विद्यार्थ्यांच्या बुद्धीला पैलू पाडण्याचे कार्य करतात; मात्र मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी पायाभरणी ही घरातूनच होते. योग्य संस्कार करून मुलांना आदर्श नागरिक म्हणून घडविण्यात शिक्षकांपेक्षा आईची जबाबदारी अधिक महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. युवराज मेश्राम यांनी केले.
ते गोंदिया पब्लिक स्कूल, लाखांदूर येथे आयोजित दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. हा उत्सव दि. २९ व ३० डिसेंबर रोजी अत्यंत आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला.
आई हीच मुलांची पहिली गुरु – डॉ. मेश्राम
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रा. डॉ. मेश्राम म्हणाले की, शाळेत जाण्यापूर्वीच मुलांच्या शिक्षणाची सुरुवात घरातून होते. आई ही मुलांची पहिली गुरु असते. आजच्या धावपळीच्या जीवनात पालकांनी, विशेषतः मातांनी, मुलांच्या सवयी, वर्तन, संगत आणि दैनंदिन वागणुकीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
मुलांच्या समोर आपण कसे वागतो, यावरच त्यांच्या आयुष्याची दिशा ठरत असते. जर आईने मुलांमध्ये नैतिक मूल्ये, शिस्त आणि चांगले संस्कार रुजविले, तर ते मूल कधीही चुकीच्या मार्गावर जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अर्जुन बुद्धे होते.
यावेळी गटशिक्षणाधिकारी भगवान वरवठे, पोलीस निरीक्षक सचिन पवार, प्राचार्य तुषार येरपुडे, संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. कमलताई बुद्धे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विवेक हाडगे, पंचायत समिती सदस्य मनोज भुरले, भाजपा तालुका अध्यक्ष उमेश देशमुख, प्रा. विश्वपाल हजारे, जितेंद्र ढोरे, गोपीचंद हटवार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी जिंकली मने
या दोन दिवसीय स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, गीत, समूहगान आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्या सौ. नीता विजय शाहू यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत कार्यक्रमामागील उद्दिष्टे स्पष्ट केली.
यशस्वी आयोजन
कार्यक्रमाचे संचालन संचालक अक्षय वासनिक यांनी केले, तर पल्लवी खरकाटे यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

