मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता महाराष्ट्रातून उड्डाण करणाऱ्या तसेच महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा बंधनकारक करावी, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि साकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नाना पटोले यांनी केली आहे.
या मागणीसाठी नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा असून राज्यातील कोट्यवधी नागरिकांच्या दैनंदिन व्यवहाराचा अविभाज्य भाग आहे. प्रवाशांना त्यांच्या मातृभाषेत आवश्यक माहिती मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर यांसह राज्यातील बहुतांश विमानतळांवरून उड्डाण करणाऱ्या किंवा येथे उतरणाऱ्या विमानांमध्ये केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेतच अनाउन्समेंट केली जाते. मात्र मराठी भाषेला अभिजात भाषेचा सन्मान मिळाल्यानंतर तिलाही विमान प्रवासात समान महत्त्व देणे आवश्यक असल्याचे पटोले यांनी अधोरेखित केले.
मराठीत उद्घोषणा झाल्यास ज्येष्ठ नागरिक, ग्रामीण भागातील प्रवासी तसेच पहिल्यांदाच विमान प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. यामुळे प्रवाशांचा गोंधळ कमी होऊन सुरक्षित आणि सुलभ प्रवासास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच मराठी भाषेच्या संवर्धन व प्रचारासाठीही हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या विषयावर नागरी विमान वाहतूक मंत्रालय, विमानतळ प्राधिकरण आणि सर्व विमान कंपन्यांनी तातडीने धोरणात्मक निर्णय घेऊन आवश्यक निर्देश जारी करावेत, अशी स्पष्ट मागणी नाना पटोले यांनी केली आहे. मराठी भाषेच्या सन्मानाशी निगडित असलेल्या या मागणीकडे आता केंद्र सरकार कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
