आकाशवाणी नागपूरच्या स्वरपरीक्षण स्पर्धेत एकोडीच्या चमूचा दैदिप्यमान विजय
नागपूर | प्रतिनिधी
प्रसार भारती, भारत सरकारच्या अखत्यारितील आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेली लोकसंगीत (पारंपरिक लोकगीत) स्वरपरीक्षण स्पर्धा २७ ऑक्टोबर २०२५ रोजी नागपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत साकोली तालुक्यातील एकोडी येथील गायक भावेश कोटंगले व त्यांच्या चमूने प्रभावी आणि दर्जेदार सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. पारंपरिक लोकसंगीताची समृद्ध परंपरा जपत सादर केलेल्या गीतांनी परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
स्मृतिशेष मनोज कोटंगले यांच्या स्मृतीस अर्पण केलेले यश
या स्पर्धेसाठी सुरुवातीला स्मृतिशेष मनोज कोटंगले यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांना या स्पर्धेत प्रत्यक्ष सहभागी होता आले नाही. त्यांच्या लोककलेवरील प्रेम, समर्पण आणि कलेप्रतीची निष्ठा लक्षात घेऊन, त्यांचे बंधू व व्यवस्थापक भावेश कोटंगले यांनी पुढाकार घेत चमूचे नेतृत्व स्वीकारले. भावनिक दु:खावर मात करत त्यांनी संपूर्ण चमूसह लोकगीतांचे सादरीकरण करत स्मृतिशेष मनोज कोटंगले यांना कलात्मक आदरांजली अर्पण केली.
लोकसंगीत स्पर्धेत भावेश कोटंगले चमू अव्वल
स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून, भावेश कोटंगले यांच्या नेतृत्वाखालील चमूने प्रथम क्रमांक पटकावल्याची घोषणा करण्यात आली. या यशाबद्दल आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे विजेत्या चमूला प्रमाणपत्रासह रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
या विजयी चमूमध्ये गायक भावेश कोटंगले, व्यवस्थापक सुभाष कोटारे तसेच संगीत साथ करणारे संदीप कोटंगले, तेजस मनोज कोटंगले, लक्ष्मीकांत बोकर, राजू उईके आणि मलिक यांचा समावेश होता. सर्व सदस्यांनी सूर, ताल, लय आणि पारंपरिक शैली यांचा उत्कृष्ट मेळ साधत उपस्थितांची मने जिंकली.
आकाशवाणीवर सादरीकरणाची संधी; लोककलेसाठी मोठी उपलब्धी
या यशानंतर गरजेनुसार आकाशवाणीवर पारंपरिक लोकगीतांचे सादरीकरण करण्याची संधी या चमूला देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल भावेश कोटंगले व त्यांच्या संपूर्ण चमूचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, ग्रामीण लोककलेच्या जतन व संवर्धनासाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे.

