प्रसार भारती, भारत सरकार अंतर्गत आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे आयोजित लोकसंगीत (पारंपरिक लोकगीत) स्वरपरीक्षण स्पर्धा दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी नागपूर येथे पार पडली. या स्पर्धेत साकोली तालुक्यातील एकोडी येथील भावेश कोटंगले व त्यांच्या चमूने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांकाचा मान पटकावला.
या स्पर्धेसाठी स्मृतिशेष मनोज कोटंगले यांनी त्यांच्या हयातीत ऑनलाइन अर्ज सादर केला होता. मात्र त्यांच्या आकस्मिक निधनामुळे ते प्रत्यक्ष सहभाग घेऊ शकले नाहीत. त्यांच्या कलेप्रती असलेल्या समर्पणाला मान देत, त्यांचे बंधू व व्यवस्थापक भावेश कोटंगले यांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली.
स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, स्मृतिशेष मनोज कोटंगले यांच्या स्मृती व आशीर्वादाने भावेश कोटंगले यांच्या नेतृत्वाखालील चमू अव्वल ठरली. या यशाबद्दल आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे विजेत्या चमूला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या चमूमध्ये गायक भावेश कोटंगले, व्यवस्थापक सुभाष कोटारे तसेच संगीत साथ करणारे संदीप कोटंगले, तेजस मनोज कोटंगले, लक्ष्मीकांत बोकर, राजू उईके आणि मलिक यांचा समावेश होता. सर्व सदस्यांना रोख पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
लवकरच गरजेनुसार आकाशवाणीवर पारंपरिक लोकगीत सादर करण्यासाठी या चमूला संधी देण्यात येणार आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल भावेश कोटंगले व संपूर्ण चमूचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
