दिव्यांग विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळत असताना, बुटीबोरी येथील आश्रय मतिमंद मुला-मुलींच्या निवासी शाळेने आपल्या उल्लेखनीय यशाने संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे. स्पेशल ऑलिंपिक भारत या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने १७ नोव्हेंबर २०२५ रोजी बंगाल येथे आयोजित फुटबॉल स्पर्धेत आश्रय शाळेच्या संघाने प्रभावी खेळ सादर करत लक्षवेधी कामगिरी केली.
या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थी प्रणय देवेंद्र थोटे व कार्तिक सहारे यांनी आपल्या उत्कृष्ट खेळतंत्र, चिकाटी आणि संघभावनेच्या जोरावर यश संपादन केले. प्रणय थोटेने शानदार खेळ करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, तर कार्तिक सहारेनेही निर्णायक क्षणी प्रभावी योगदान देत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या यशामुळे शाळेसह संपूर्ण जिल्हा व राज्याचा नावलौकिक वाढला आहे.
प्रणय थोटेच्या सुवर्ण यशामुळे दिव्यांग क्रीडा क्षेत्रात नव्या प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले असून, योग्य मार्गदर्शन व संधी मिळाल्यास दिव्यांग विद्यार्थीही राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश गाठू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या अभिमानास्पद कामगिरीनंतर बुटीबोरी परिसरात खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या यशामागे शाळेतील शारीरिक शिक्षक अखिलेश पांडे व दत्ता चिकनकर यांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण, शिस्तबद्ध सराव व प्रेरणादायी मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. तसेच शाळेतील शिक्षकवर्गाने दिलेले मानसिक व शैक्षणिक पाठबळही या यशात निर्णायक ठरले आहे.
संस्थेचे सचिव रमेश भंडारी यांनीही विद्यार्थ्यांना व शिक्षकांना वेळोवेळी प्रोत्साहन देत क्रीडा उपक्रमांना भक्कम आधार दिला. त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळेच विद्यार्थी राष्ट्रीय व्यासपीठावर झेप घेऊ शकले, अशी भावना पालक व शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या यशाची दखल घेत स्थानिक आमदार समीर मेघे यांनी आश्रय शाळेच्या संपूर्ण संघाला आमंत्रित करून सुवर्णपदक विजेते प्रणय थोटे व कार्तिक सहारे यांचा विशेष सन्मान केला. आमदारांनी दोन्ही खेळाडूंना भावी क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शारीरिक शिक्षक अखिलेश पांडे, दत्ता चिकनकर तसेच विशेष शिक्षक विशाल जुमडे व दिनेश बावणे उपस्थित होते.
या सुवर्ण यशामुळे दिव्यांग क्रीडा क्षेत्रात बुटीबोरीचे नाव अधिक उजळले असून, भविष्यात येथील अनेक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कौशल्याचा ठसा उमटवतील, असा विश्वास शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
