नागपूर ग्रामीण :कुही तालुक्यातील गोन्हा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात पार पडला. या महोत्सवात परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपली क्रीडा कौशल्ये, कलागुण आणि सर्जनशीलता प्रभावीपणे सादर केली.
कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत गोन्हाच्या सरपंच श्रीमती सीमाताई भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. लोपचंद पडोळे यांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेली सुप्त गुणवत्ता अशा मंचांमुळे पुढे येत असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही सातत्याने प्रगती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
केंद्रस्तरीय महोत्सवाचे यशस्वी आयोजन श्री. राजाराम रत्नम व श्री. हर्षवर्धन डोंगरे (जिल्हा परिषद शाळा, गोन्हा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. क्रीडा स्पर्धांमध्ये विविध मैदानी व बौद्धिक खेळांचा समावेश होता. तर सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य, समूहगीत, नाट्यछटा आणि इतर सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राकेशजी डोंगरे सर यांनी प्रभावी व रसपूर्ण शैलीत केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी श्री. हर्षवर्धन डोंगरे सर यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.
या केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळाली असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
