भंडारा :लाखनी तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा, सर्जनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, या उद्देशाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. पंचायत समिती लाखनी अंतर्गत एम. पब्लिक स्कूल, मानेगाव सडक येथे भरलेल्या या प्रदर्शनीला विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
या विज्ञान प्रदर्शनीत तालुक्यातील तब्बल ७५ प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे. विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या विविध संकल्पनांवर आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प, प्रयोग आणि मॉडेल्स सादर केले असून, त्यांच्या कल्पकतेचे आणि अभ्यासपूर्ण मांडणीचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे. पर्यावरण संरक्षण, नवीकरणीय ऊर्जा, आरोग्य, जलसंवर्धन, तंत्रज्ञान आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विज्ञान विषयांवर आधारित प्रकल्पांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना योग्य दिशा देत त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम शिक्षकांनी केले. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढताना दिसून येत आहे.
याच ठिकाणी नवभारत साक्षरता उपक्रमांतर्गत उल्हास मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात साक्षरतेचे महत्त्व, शिक्षणाचे फायदे आणि समाजप्रबोधन यावर भर देण्यात आला आहे. बाल वैज्ञानिक मेळाव्याला भेट देण्यासाठी संपूर्ण तालुक्यातून विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
ही विज्ञान प्रदर्शनी आणि उल्हास मेळावा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरत असून, भविष्यातील वैज्ञानिक घडवण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले आहे.
