साकोली नगरपरिषद: देवश्री मनीष कापगते नगराध्यक्ष, कापगते कुटुंबाचे वर्चस्व कायम
भंडारा: साकोली व परिसरातील राजकारणात कापगते कुटुंबाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. दशकानुदशकांपासून सुरू असलेली ही राजकीय परंपरा आता अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसत आहे. २१ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत देवश्री मनीष कापगते यांनी साकोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदावर विजय मिळवला असून, कापगते कुटुंबाच्या राजकीय वारशात नवा अध्याय जोडला गेला आहे.
साकोलीत कापगते कुटुंबाला ‘राजयोग’ लाभलेले कुटुंब म्हणून पाहिले जाते. राजकारणात यश मिळवण्यासाठी इच्छाशक्तीबरोबरच जनतेचा विश्वास आणि योग्य काळाची साथ महत्त्वाची ठरते, हे या कुटुंबाने वेळोवेळी सिद्ध केले आहे. निवडणुकीत अनेक उमेदवार रिंगणात असले तरी विजयाचा कौल काही मोजक्यांच्याच बाजूने लागतो, हे यावेळी पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
कापगते कुटुंबाचा राजकीय प्रवास १९६० च्या दशकात सुरू झाला. सुरुवातीच्या संघर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभेपर्यंत या कुटुंबाने आपली मजबूत पकड निर्माण केली. पुढील पिढ्यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि विधानसभा अशा विविध स्तरांवर जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
विशेष बाब म्हणजे या कुटुंबात महिला नेतृत्वालाही समान महत्त्व देण्यात आले आहे. नगरपरिषद, जिल्हा परिषद तसेच महिला व बालकल्याण समित्यांमध्ये महिलांनी सक्रिय भूमिका बजावत सामाजिक कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे कापगते कुटुंबाची ओळख केवळ सत्ताधारी म्हणून नव्हे, तर विकासाभिमुख व लोकाभिमुख नेतृत्व म्हणून निर्माण झाली आहे.
सध्या साकोलीतील नागरिकांकडून कापगते कुटुंबाकडून विकास, पारदर्शक प्रशासन आणि स्थिर नेतृत्वाच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. पिढ्यान्पिढ्या टिकून राहिलेली सत्ता जपत जनतेचा विश्वास कायम ठेवणे, हेच या कुटुंबासमोरचे प्रमुख आव्हान ठरणार आहे.

