भंडारा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 दरम्यान मतदान प्रक्रियेत गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. निवडणूक कामकाजात सहभागी असलेल्या सात अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून, ही कारवाई महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 अंतर्गत करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा (नगर विकास विभाग) यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, प्रभाग क्रमांक 33 मधील सदस्य पदासाठी झालेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान यंत्र (Ballot Unit) तयार करताना तांत्रिक स्वरूपाची चूक झाल्याचे निदर्शनास आले. मतदान यंत्रामध्ये उमेदवारांची संख्या, ‘नोटा’ (NOTA) पर्याय तसेच बटणांची मांडणी यामध्ये विसंगती आढळून आली. ही बाब निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांच्या विरोधात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने संबंधित मतदान केंद्रातील प्रक्रिया संशयास्पद ठरवत जिल्हा प्रशासनाला तात्काळ कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार, मतदान अधिकारी, सहाय्यक अधिकारी आणि निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. प्राथमिक चौकशीनंतर दोषी आढळलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
निलंबन कालावधीत संबंधित अधिकारी–कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे मुख्यालय ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, या काळात कोणत्याही प्रकारचे निवडणूक अथवा प्रशासकीय काम करण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, दोष सिद्ध झाल्यास पुढील शिस्तभंगात्मक कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
या घटनेमुळे भंडारा नगरपरिषदेच्या निवडणूक प्रक्रियेतील काटेकोरपणा आणि पारदर्शकतेबाबत चर्चा सुरू झाली असून, भविष्यात अशा त्रुटी टाळण्यासाठी निवडणूक यंत्रणेकडून अधिक दक्षता घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

