नागपूर | प्रतिनिधी
नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक व बुटीबोरी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ₹2 लाख 69 हजार 500 रुपये किमतीची 52.30 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडर जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात एमडी पावडर विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली असून, मुख्य तस्कर कोण? याचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास तीव्र करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुटीबोरी–बोऱ्हाडी शिवारा परिसरातील रेल्वे फाटकाजवळ रविवारी (दि. 4) ही कारवाई करण्यात आली. मंगेश गोपाल भोंडगे (वय 34, रा. मेटामारी, ता. हिंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गस्तीदरम्यान संशयास्पद हालचाली आढळल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून एमडी पावडर जप्त करण्यात आली.
प्राथमिक चौकशीत आरोपी एमडी पावडर विक्री करत असल्याची कबुली देत असून, ही पावडर त्याला नेमकी कुणाकडून मिळाली, पुरवठा साखळी कशी आहे आणि आणखी कोण कोण या रॅकेटमध्ये सहभागी आहेत, याबाबत सखोल तपास सुरू आहे. या कारवाईमुळे ग्रामीण भागात अमली पदार्थांच्या तस्करीवर मोठा आघात बसल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास बुटीबोरी पोलीस करीत आहेत.

