मुंबई | प्रतिनिधी
मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज, गुरुवारी मतदान पार पडत असून, महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ही निवडणूक म्हणून पाहिली जात आहे. विशेषतः बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. महामुंबईतील नऊ महानगरपालिकांच्या एकूण 1,046 जागांसाठी आज मतदार आपला कौल देत आहेत.
निवडणूक आयोगाने मतदानासाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. राज्यभरात ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदारांची नोंदणी झाली असून, या निवडणूक रणांगणात १५ हजार ९३१ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची रांग पाहायला मिळत आहे.
मुंबईची लढत ठरतेय राज्याच्या राजकारणाची दिशा
या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गटासमोर ठाकरे बंधूंचे आव्हान उभे आहे. त्यामुळे ही लढत केवळ महापालिकेपुरती मर्यादित न राहता, राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी ठरण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, अजित पवार यांनी पुणे–पिंपरी चिंचवड भागात आपली ताकद एकवटली असून, तेथेही रंगतदार सामना पाहायला मिळत आहे. अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली आहे.
मतमोजणी उद्या; निकालाकडे सर्वांचे लक्ष
मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उद्या, शुक्रवारी सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईसह राज्यातील सत्तासमीकरणे कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
ही निवडणूक केवळ महापालिकांच्या सत्तेसाठी नसून, महाराष्ट्राच्या आगामी राजकीय समीकरणांचा कौल देणारी ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

