Bangalore (बंगळूर): महाराष्ट्र शासनाच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (ANTF) एमडी ड्रग्जच्या अवैध व्यवसायाविरोधात मोठी आणि निर्णायक कारवाई करत कर्नाटकातील बंगळूर शहरात सुरू असलेले तीन एमडी ड्रग्ज बनवणारे कारखाने नष्ट केले आहेत. या संयुक्त कारवाईत तब्बल 55 कोटी 88 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आंतरराज्यीय ड्रग्ज नेटवर्कला जबर धक्का बसला आहे.
या प्रकरणाची सुरुवात 21 डिसेंबर 2025 रोजी नवी मुंबईतील वाशी परिसरात झालेल्या कारवाईतून झाली. कोकण कृती गटाने छापा टाकत आरोपी अब्दुल कादर रशीद शेख याच्याकडून 1 किलो 488 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केली होती. या घटनेनंतर तपास अधिक गतीने पुढे नेण्यात आला. चौकशीदरम्यान आणि तांत्रिक माहितीच्या आधारे बेळगाव येथील प्रशांत यल्लापा पाटील हा एमडी ड्रग्ज तयार करणारा प्रमुख आरोपी असल्याचे स्पष्ट झाले.
तपास पुढे जाताच बंगळूर शहरातील विविध भागांमध्ये एमडी ड्रग्ज तयार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने बंगळूर येथे छापे टाकून सुरज रमेश यादव आणि मालखान रामलाल बिश्नोई या दोघांना ताब्यात घेतले. आरोपींच्या कबुलीनंतर स्पंदना लेआउट, एनजी गोलाहळी परिसरातील फॅक्टरी आणि येरपनाहळी-कन्नूर येथील लोकवस्तीतील एका घरामध्ये सुरू असलेले एमडी ड्रग्ज कारखाने उघडकीस आले.
या तिन्ही ठिकाणांहून 4 किलो 100 ग्रॅम घन स्वरूपातील आणि 17 किलो द्रव स्वरूपातील एमडी, तसेच रसायने व यंत्रसामग्री जप्त करण्यात आली. या कारखान्यांत तयार होणारे ड्रग्ज देशातील विविध राज्यांमध्ये पुरवले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, आणखी दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थांविरोधातील लढ्यात महत्त्वाचे यश मिळाले असून, नागरिकांनी अशा गुन्ह्यांविषयी माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

