भंडारा | दि. 08 जानेवारी 2026
पवनी शहरात अवैध रेती वाहतुकीविरोधात पोलीस व महसूल विभागाने संयुक्त कारवाई करत मोठा धक्का दिला आहे. स्था.गु. शा. भंडारा येथील उपविभाग पवनी पथकाने पोलीस स्टेशन पवनी हद्दीतील मौजा पवनी येथे छापा टाकून दोन टिप्पर पकडले.
या कारवाईदरम्यान टिप्पर क्र. MH49/BG 1717 चा चालक कैसर अली रिजाउद्दीन शेख (वय 47, रा. खरबी, नागपूर) याच्या ताब्यातून अंदाजे 07 ब्रास रेती बेकायदेशीररीत्या वाहतूक करताना आढळून आली. तसेच टिप्पर क्र. MH49/BL 2845 चा चालक व मालक (फरार) यांनी विनापास परवाना अंदाजे 05 ब्रास रेतीची चोरटी वाहतूक केल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी तलाठी सचिन आगलावे (तहसील कार्यालय, पवनी) यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पवनी येथे गुन्हा क्र. 06/2026 नोंदवण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध कलम 303(2), 3(5) भा.न्या.सं. तसेच कलम 48(8) म.ज.म. अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त मुद्देमाल:
- 12 ब्रास रेती – अंदाजे ₹72,000/-
- दोन टिप्पर – अंदाजे ₹80,00,000/-
- एकूण जप्त किंमत – ₹80,72,000/-
अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात प्रशासनाची ही कारवाई पुढेही कठोरपणे सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

