विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाकडून गांधी चौकात आंदोलन
भंडारा : बांगलादेशात हिंदू युवक दीपू चंद्रदास यांची निर्घृणपणे हत्या करून मृतदेह जाळल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी भंडारा शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी चौक परिसरात हे आंदोलन पार पडले. या घटनेमुळे हिंदू समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवरील वाढत्या अत्याचारांविरोधात जोरदार आवाज उठवण्यात आला.
आंदोलनादरम्यान बांगलादेश सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले. बांगलादेशात हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यावेळी बांगलादेश सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले. “हिंदूंवरील अन्याय सहन केला जाणार नाही” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
आंदोलकांनी बांगलादेशात हिंदू समाज सुरक्षित नसल्याचा आरोप करत भारत सरकारने या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी केली. बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील हल्ले थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव टाकण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. दीपू चंद्रदास यांच्या हत्येतील दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली.
यासोबतच भारतात राहणाऱ्या अवैध बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांचा मुद्दाही आंदोलनात उपस्थित करण्यात आला. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे गंभीर असल्याचे सांगत, अशा नागरिकांना तातडीने देशाबाहेर हाकलण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. विशेषतः भंडारा शहरात राहणाऱ्या अवैध रोहिंग्यांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
या आंदोलनात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने हिंदू समाजबांधव उपस्थित होते. आंदोलन शांततेत पार पडले असले तरी उपस्थितांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळाला. बांगलादेशातील हिंदूंवरील अन्यायाविरोधात आवाज उठवत राहणार, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

