लाखनी | प्रतिनिधी
लाखनी : तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. घरकुल बांधकामासाठी मंजूर लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ ब्रास रेतीचे वाटप करण्यात येणार असून, याबाबत तहसील प्रशासनाकडून अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या जाहीरनाम्यानुसार, लाखनी तालुक्यातील निलागोंदी, मुरमाडी (तू.), मोरगाव, मिरगाव, मासलगेटा, मांगली, भचारणा, लोहार, लाखोरी, लाखनी, खुनारी, खेडपार, खारशी, केसलबाडा (वा.), जेवनाळा, ईसापूर, गोंडसावरी, घोडेझरी, पालांदूर, म. हेंगाव, चान्ना, बोरगाव, पाथरी आदी गावांतील घरकुल लाभार्थ्यांना हा लाभ दिला जाणार आहे.
मिरगाव रेतीघाटावरून वाटप
घरकुलसाठी रेतीचे वाटप मिरगाव रेतीघाट येथे २२ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार असून, दररोज (रविवार वगळून) सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत वितरण प्रक्रिया राबविण्यात येईल.
आधी रेती न मिळालेल्यांना प्राधान्य
ज्या लाभार्थ्यांना अद्याप घरकुलासाठी रेती मिळालेली नाही, अशा लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. यापूर्वी रेती उचललेली असल्यास संबंधित लाभार्थ्यांना पुन्हा रेती दिली जाणार नाही, असेही जाहीरनाम्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
आवश्यक कागदपत्रे बंधनकारक
रेती उचलण्यासाठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड, नोंदणीवेळी दिलेला मोबाईल क्रमांक, ट्रॅक्टर-ट्रॉलीसह मजूर सोबत आणणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

दरम्यान, सदर जाहीरनाम्याची प्रत संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ही माहिती प्र. तहसीलदार, लाखनी यांच्या स्वाक्षरीने अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.

