नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय बॉम्बस्फोट घडवून उडविण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली. गुरुवारी सकाळी न्यायाधीशांना पाठविण्यात आलेल्या या ई-मेलमध्ये न्यायालय परिसरात स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेनंतर तातडीने पोलिस व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या.
धमकी मिळताच जिल्हा न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला. बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS), श्वान पथक तसेच पोलिसांच्या विशेष पथकांनी संपूर्ण न्यायालय परिसराची कसून तपासणी केली. न्यायालयातील सर्व दालने, न्यायाधीशांचे कक्ष, जिने, लिफ्ट तसेच आवारातील प्रत्येक कोपरा तपासण्यात आला.
सुमारे दोन तास चाललेल्या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे ही धमकी अफवा असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, या प्रकारामुळे न्यायालयातील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून पुढील काळात सुरक्षा अधिक कडक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
दरम्यान, हा धमकीचा ई-मेल कुठून आणि कोणी पाठविला याचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेण्यात आली आहे. संबंधित ई-मेल आयडी, आयपी अॅड्रेस आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे काही काळ न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला असला, तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
न्यायालय परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

