भंडारा : मोहाडी तालुकातील चिचोली गावात स्मशानभूमीच्या जागेच्या मोजमापासाठी होत असलेल्या दीर्घ विलंबामुळे ग्रामस्थांचा संताप उफाळून आला. प्रशासनाकडून वेळेत दखल न घेतल्याने अखेर संतप्त नागरिकांनी चक्क मृतदेहासह तहसील व भूमी अभिलेख कार्यालयाला घेराव घातला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
चिचोली गावातील जुना गट क्रमांक ३४६ हा नदीपात्र व नदीकाठाचा भाग असून, अनेक दशकांपासून याच ठिकाणी अंत्यसंस्कार होत असल्याची नोंद अधिकृत शासकीय दस्तऐवजांत आहे. मात्र, अलीकडील काळात लगतच्या काही शेतकऱ्यांकडून या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे. परिणामी गावात अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेली जागा अपुरी पडू लागली असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्मशानभूमीच्या जागेच्या मोजणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचायतीकडून तहसील कार्यालय व भूमी अभिलेख विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. लेखी आदेश असूनही प्रत्यक्ष मोजणी होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढत गेला. अखेर अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध नसल्याने मृतदेहासह मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
या आंदोलनानंतर परिस्थिती चिघळू नये म्हणून स्थानिक पोलिसांनी हस्तक्षेप केला. पोलिसांच्या मध्यस्थीने अखेर संबंधित जागेवर प्रत्यक्ष मोजमाप करण्यात आले. प्रशासनाने तातडीने हालचाल केल्याने काही प्रमाणात तणाव निवळला.
प्रभारी तहसीलदार विमल थोटे यांनी ग्रामपंचायतीच्या अर्जानुसार भूमी अभिलेख कार्यालयाला मोजणीचे आदेश दिले असल्याचे सांगितले असून, मोजणी अहवाल लवकरच सादर केला जाईल, असे स्पष्ट केले. भूमी अभिलेख कार्यालयाचे प्रभारी उपअधीक्षक हरिदास नारनवरे यांनीही आदेशानुसार मोजणी पूर्ण झाल्याची माहिती दिली.
दरम्यान, उपसरपंच विजय लष्करे यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत, अतिक्रमणामुळे गावात अंत्यसंस्कारासाठी जागाच उरलेली नसल्याचे सांगितले. ग्रामस्थांच्या आंदोलनानंतरच प्रशासन हालचाल करत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
या संपूर्ण घटनेमुळे महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, वेळेत निर्णय न झाल्यास नागरिकांना टोकाचे पाऊल उचलावे लागते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

