भंडारा | प्रतिनिधी
पत्रकारितेचे कार्य केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित नसून, समाजाला योग्य दिशा देणे आणि तो अधिक सक्षम करणे ही तिची मोठी जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी केले. भंडारा येथे आयोजित पत्रकार संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकशाही व्यवस्थेत पत्रकारिता हा चौथा स्तंभ मानला जातो. समाजातील वास्तव, समस्या, अन्याय आणि सकारात्मक घडामोडी निर्भीडपणे मांडण्याचे काम पत्रकार करतात. त्यामुळे बातमी सादर करताना सत्यता, सामाजिक बांधिलकी, कायद्याची मर्यादा आणि नैतिकता यांचे भान ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे नूरुल हसन यांनी सांगितले. सनसनाटीपणा टाळून वस्तुनिष्ठ आणि जबाबदार पत्रकारिता केल्यास समाजात सकारात्मक बदल घडू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आजच्या डिजिटल युगात माहिती वेगाने पसरत असली तरी चुकीची व अपुरी माहिती समाजात गैरसमज निर्माण करू शकते. त्यामुळे पत्रकारांनी माहितीची खातरजमा करूनच बातम्या प्रसिद्ध कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. पोलीस प्रशासन आणि पत्रकार यांच्यात समन्वय राहिल्यास कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अनेक प्रश्न सोडवणे सोपे जाते, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमादरम्यान जिल्ह्यातील ज्येष्ठ, अनुभवी तसेच नवोदित पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांनी आपल्या कामातील अडचणी, जबाबदाऱ्या आणि समाजाशी निगडित विविध प्रश्न मांडले. यावर उत्तर देताना पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी प्रशासन पत्रकारांच्या सकारात्मक भूमिकेला नेहमीच सहकार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला.

