नागपूर: रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना फसवून त्यांच्या दागिन्यांची व मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या टोळीचा गणेशपेठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पाच जणांच्या टोळीला अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण 16.75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान यातील 11.45 लाख रुपयांचा माल चोरीचा असल्याची खात्री पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही टोळी रेल्वे स्थानक परिसरात येणाऱ्या प्रवाशांशी ओळख वाढवून त्यांचा विश्वास संपादन करत होती. त्यानंतर प्रवाशांना ऑटोरिक्षातून प्रवासाची ऑफर देऊन, प्रवासादरम्यान त्यांच्या बॅगमधील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्या जात होत्या. अशा प्रकारच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचत संबंधित टोळीला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये इमरान ऊर्फ सोनू इजाज खान (वय 41), शाहदत खान हबीब खान (वय 28), अब्दुल नदीम शेख (वय 28), असीम अहमद (वय 42) आणि रवींद्र कुमार ऊर्फ दालू भुरे सिंग (वय 50) यांचा समावेश आहे.
आरोपींकडून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. ही टोळी यापूर्वीही अशाच प्रकारच्या अनेक चोरीच्या प्रकरणांत सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे अधिक गुन्हे आणि पीडितांचा शोध घेण्यासाठी सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, गणेशपेठ पोलिसांनी नागपूर रेल्वे स्थानकावर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या ऑटोरिक्षा सेवांचा स्वीकार करू नये, असेही स्पष्ट केले आहे.

