भंडारा, प्रतिनिधी :
भंडारा जिल्ह्यात धान खरेदीचे उद्दिष्ट संपल्याने हजारो शेतकरी अडचणीत सापडले असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर धान खरेदी संघटना आणि किसान संघ यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला सरपंच संघटनेचा ठाम पाठिंबा मिळाला असून खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनीही या आंदोलनात सहभागी होत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला.
धान खरेदीची मर्यादा संपल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान गोदामांमध्ये अडकून पडले आहे. शासनाने उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगून खरेदी थांबविल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय, त्रिमूर्ती चौक येथे धडक देत प्रशासनाकडे ठोस निर्णयाची मागणी केली.
मोर्चात सहभागी शेतकरी संघटनांनी स्पष्ट इशारा दिला की, शासनाने तात्काळ धान खरेदी पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांचे धान उचलावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. यावेळी भंडाऱ्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेले दिसत असून पुढील काही दिवसांत परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Byte – खासदार डॉ. प्रशांत पडोळे:
“शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मी त्यांच्या सोबत आहे. धान खरेदी तात्काळ सुरू व्हावी यासाठी शासनाकडे ठोस मागणी करणार आहे.”

