पालांदूर येथील एम.एस. इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये चौथे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात
पालांदूर, दि. ६ फेब्रुवारी २०२६ :
पालांदूर येथील एम.एस. इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित चौथे वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि पालकांच्या भरघोस प्रतिसादामुळे अत्यंत आनंदी वातावरणात पार पडले. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या निरागस नृत्यसादरीकरणाने व रंगीबेरंगी वेशभूषेने संपूर्ण परिसरात उत्साह संचारला.
या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मा. लताताई कापसे, सरपंच पालांदूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. आसिफ अली सय्यद सर, श्रीमती अचलाताई फटे, सरपंच मचारणा, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री राघोर्ते मॅडम, श्रीमती विभाताई माणिकराव शिंदे, श्रीमती पद्मा लोकेश शिंदे तसेच शाळेचे संस्थापक श्री. लोकेश माणिकराव शिंदे हे मान्यवर मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रभावी समालोचन वामिनी ताई खंडाईत मॅडम यांनी केले. नर्सरी, केजी-वन व केजी-टू मधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक सादरीकरणाला प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट होत होता.
विद्यार्थ्यांच्या सादरीकरणासाठी श्रीमती ज्योती दोनोडे मॅडम, श्रीमती नालंदा देशपांडे मॅडम, श्रीमती शितल यावलकर मॅडम, कुमारी वामिनी खंडाईत मॅडम व श्रीमती मेश्राम मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त व कला-कौशल्यांचा सुंदर मिलाफ दिसून आला.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्व विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्नेहसंमेलनामुळे पालांदूर परिसरातील शैक्षणिक व सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध झाले असून, पालक व ग्रामस्थांकडून शाळेच्या उपक्रमांचे मनापासून कौतुक करण्यात आले.

