महाराष्ट्रात: सध्या थंडीची तीव्रता वाढताना दिसत असून नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसांत पाऱ्याची घसरण कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील अनेक भागांत किमान तापमान लक्षणीयरीत्या खाली आले आहे.
नववर्षाचे स्वागत यंदा थंडीच्या कडाक्यानेच होणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.शुक्रवारी मुंबईत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये तापमान थेट ८ ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे.
त्यामुळे पहाटे व रात्रीच्या वेळी गारठ्याचा अनुभव नागरिकांना येत आहे.ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर आणि जानेवारीच्या सुरुवातीला थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीदरम्यान किमान तापमान आणखी कमी होऊ शकते, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सांगितले की, हिमालयीन भागात अपेक्षित प्रमाणात बर्फवृष्टी झालेली नसली तरी उत्तराखंड व हिमाचल प्रदेशाच्या काही भागांत बर्फवृष्टीची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून उत्तर भारतातून येणारे थंड वारे अधिक सक्रिय होतील आणि त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील तापमानावर दिसून येईल.
राज्यातील जेऊर येथे किमान तापमान ८.५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून गोंदिया, नाशिक, मालेगाव, भंडारा, यवतमाळ आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये तापमान ९ ते ११ अंशांच्या दरम्यान नोंदवले गेले आहे. महाबळेश्वर, सातारा आणि सांगलीसारख्या भागांतही थंडीचा प्रभाव वाढला आहे.हवामान विभागाने नागरिकांना पहाटे व रात्रीच्या वेळेत आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी थंडीपासून संरक्षण घेणे आवश्यक आहे. एकूणच, नव्या वर्षाची सुरुवात महाराष्ट्रात थंड वातावरणात होणार असून पुढील काही दिवस गारठ्याचेच राहणार आहेत.

