भंडारा | प्रतिनिधी
भंडारा नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, नवनिर्वाचित नगरसेविका शुभांगी लोकेश खोब्रागडे यांची नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. हा निर्णय भंडारा येथील पक्ष कार्यालयात पार पडलेल्या सदस्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भंडारा जिल्हा अध्यक्ष नाना पंचबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत पक्षातील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. नगर परिषदेत पक्षाची प्रभावी भूमिका राहावी, विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग वाढावा आणि संघटन मजबूत व्हावे, या उद्देशाने शुभांगी खोब्रागडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
बैठकीदरम्यान पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शुभांगी खोब्रागडे यांच्यावर विश्वास व्यक्त करत, गटनेता म्हणून त्यांच्याकडून अपेक्षित असलेल्या जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन केले. आपल्या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देताना शुभांगी खोब्रागडे यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, “पक्षाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. नगर परिषदेतील जनहिताच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवून विकासासाठी काम करेन,” असे सांगितले.
गटनेता निवडीची अधिकृत माहिती जिल्हाधिकारी कार्यालय तसेच नगर परिषद प्रशासनाकडे सादर करण्यात आली आहे. या निवडीमुळे भंडारा नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका अधिक संघटित व प्रभावी होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

