अकोला: शहरात भारतीय जनता पक्षाविरोधात तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचालींना आता पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे. भाजपमधून निलंबित करण्यात आलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र राजकीय पर्याय उभा करण्याचा प्रयत्न सुरू केला होता.
मात्र, हा प्रयोग प्रत्यक्षात येण्यापूर्वीच भाजपने योग्य वेळी हस्तक्षेप करत परिस्थिती आपल्या बाजूने वळवली असल्याची माहिती विश्वासार्ह सूत्रांकडून समोर आली आहे.
नाराज आणि निलंबित नेत्यांना पुन्हा पक्षप्रवाहात आणण्यासाठी भाजपकडून आखण्यात आलेल्या ‘घरवापसी’ रणनीतीला अपेक्षित यश मिळाले आहे. यामध्ये माजी नगरसेवक हरीश अलीमचंदानी, अॅड. गिरीश गोखले, डॉ. अशोक ओळंबे यांचा समावेश असून, आशिष पवित्रकार यांचीही लवकरच पक्षात पुनःप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे, अॅड. गिरीश गोखले यांनी काही दिवसांपूर्वीच अधिकृतरीत्या भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती आहे.
नागपुरातील भेटीने बदलली राजकीय दिशा
विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षशिस्त भंगल्याच्या कारणावरून काही नेत्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरच या नेत्यांनी भाजपविरोधात स्वतंत्र आघाडी उभारण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, अलीकडेच या सर्व पदाधिकाऱ्यांनी नागपूर येथे चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली.
या बैठकीनंतर मध्यस्थीच्या माध्यमातून तोडगा निघाल्याचे समजते. निलंबन मागे घेण्याचा निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, संबंधित नेत्यांची भाजपमध्ये अधिकृत घरवापसी निश्चित मानली जात आहे. आगामी निवडणुकांमध्ये त्यांना पक्षाकडून संधी मिळणार का, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
भाजपच्या हालचालींमुळे तिसऱ्या आघाडीचा फुगा फुटला
शहरात भाजपविरोधी पर्याय उभा करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पक्षाने संवादाचा मार्ग स्वीकारत नाराज नेत्यांना पुन्हा जवळ केले. त्यामुळे तिसरी आघाडी स्थापन होण्याआधीच तिचा डाव अपयशी ठरल्याची चर्चा सध्या अकोल्यातील राजकीय वर्तुळात रंगत आहे.

