भंडारा, 27 फेब्रुवारी 2026 (प्रतिनिधी):
जिल्ह्यात रेत घाटांची नियमित लिलाव प्रक्रिया होऊनही ‘सुपर एंट्री’ या नावाखाली अवैध रेत वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांनी केला आहे. या प्रकारामुळे शासनाच्या महसुलाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले.
वाघमारे म्हणाले की, रेत उत्खननास प्रतिबंध असतानाही विशेष परवानगीच्या नावाखाली रेत चोरीला मोकळीक दिली जात आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री यांना गोपनीय पत्र पाठवून तातडीने कारवाईची मागणी केली आहे. काही अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळेच अवैध वाहतूक सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
‘हॅपी अवर’मध्ये फक्त मेसेज; प्रत्यक्षात नियंत्रण नाही
वाघमारे यांनी पुढे सांगितले की, जिल्ह्यात ठरावीक वेळेत ‘हॅपी अवर’च्या नावाखाली रेत वाहतुकीसाठी फक्त संदेश पाठवले जातात. मात्र महसूल, पोलिस व संबंधित विभागांचे अधिकारी फोनवरही प्रतिसाद देत नाहीत. अवैध वाहनांना रस्त्यावर मोकळीक मिळते आणि काही अधिकारी औपचारिकता पूर्ण करून जबाबदारी टाळतात. त्यामुळे प्रशासनाची कार्यपद्धती संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.
जिल्ह्यातील सर्व 124 घाट बंद करण्याचा निर्णय
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सर्व 124 रेत घाट बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारची अवैध रेत वाहतूक सहन केली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

