फेब्रुवारी-मार्च 2026 मधील SSC-HSC परीक्षांसाठी शिक्षण विभागाची ठोस पावले
भंडारा | प्रतिनिधी
फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या माध्यमिक (SSC) आणि उच्च माध्यमिक (HSC) प्रमाणपत्र परीक्षांचा कालावधी लक्षात घेता, परीक्षा पूर्णपणे नकलमुक्त, पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने तयारीला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा केंद्रांवरील प्रत्येक वर्गात CCTV कॅमेरे बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या अनुषंगाने भंडारा शहरातील जे. एम. पटेल महाविद्यालय येथे जिल्हास्तरीय विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत नाशिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शशिकांत पाटील, सचिव निलेश सोनटक्के, सहसचिव मिलिंद पाटील, अधीक्षक विनोद देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी मनोज गजभिये, उपशिक्षणाधिकारी राहुल लांजे तसेच जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व शिक्षण विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान परीक्षांच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक नियमावली, जबाबदाऱ्या व दक्षतेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. परीक्षा केंद्रांवरील CCTV कॅमेरे कार्यक्षम अवस्थेत असणे बंधनकारक असून, नकलमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी त्यांचा वापर करण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण येऊ नये, याचीही विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची पायरी असून, ती भयमुक्त आणि विश्वासार्ह वातावरणात पार पडणे अत्यावश्यक आहे. यासाठी परीक्षा केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
या बैठकीमुळे आगामी SSC-HSC परीक्षा अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि नकलमुक्त होतील, असा विश्वास शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

