भंडारा: भंडारा शहरात बायपास मार्ग उपलब्ध असतानाही अवैध रेती वाहतूक थेट शहरातूनच सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पहाटेपासून शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवरून भरधाव वेगाने धावणारे रेतीचे टिप्पर पाहता, नागरिकांचे सकाळी फिरायला बाहेर पडणे जवळपास बंद झाले आहे.
पूर्वी पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यांवर दिसायचे. मात्र सध्या जड टिप्पर, धूळ, प्रचंड आवाज आणि अपघाताची भीती यामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शहराला बायपास असताना देखील रेतीची वाहतूक शहरातूनच केली जात असल्याने संशय व्यक्त केला जात आहे. वेळ वाचवण्यासाठी आणि तपास टाळण्यासाठी शहरातील रस्त्यांचा वापर केला जात असल्याची चर्चा आहे. यामुळे वाहतूक कोंडी, धूळप्रदूषण आणि अपघाताचा धोका वाढत आहे.
अवैध रेती वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणा पहाटेच्या वेळेत सक्रिय नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. नागरिक रस्त्यावर नसल्याचा फायदा घेत रेती माफिया आपली वाहतूक निर्धास्तपणे करत असल्याचे चित्र सध्या भंडारा शहरात दिसून येत आहे.
या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, बायपास असताना शहरातून सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी भंडारकर नागरिकांकडून केली जात आहे.
बायपास असूनही शहरातून अवैध रेती वाहतूक; भीतीमुळे भंडारकरांचे सकाळी फिरणे बंद

Mukesh Kewat is a Maharashtra-based journalist working with VBN News. He reports on cyber crime, technology, public awareness campaigns, social issues, agriculture, and local governance, with a strong focus on credible and ground-level reporting.
Leave a Comment
