भंडारा | प्रतिनिधी
भंडारा शहरातील शास्त्री चौक परिसरात मंगळवारी सकाळी सफाई करत असताना एका महिला सफाई कर्मचाऱ्याचा रिलायन्स मार्टच्या कर्मचाऱ्याशी वाद झाला. हा वाद इतका वाढला की संबंधित कर्मचाऱ्याने कथितरित्या शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरातील सफाई कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच इतर सफाई कर्मचारी एकत्र आले. त्यांनी काम बंद ठेवत थेट पोलीस ठाण्याच्या परिसरात जाऊन ठिय्या आंदोलन केले. सकाळी सुमारे ११ वाजता मोठ्या संख्येने सफाई कर्मचारी पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले होते. संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई होईपर्यंत मागे हटणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला.
सफाई कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, महिला कर्मचाऱ्यांशी अशा प्रकारे गैरवर्तन होणे अत्यंत गंभीर असून यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी आपल्या रोजच्या कामकाजातील अडचणीही प्रशासनासमोर मांडल्या.
विशेषतः पहाटे ६ वाजल्यापासून शहरात सफाईचे काम सुरू करावे लागते. त्या वेळेस अनेक भागात पुरेसा प्रकाश नसल्यामुळे सुनसान परिसरात काम करताना भीती वाटते, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या घटनेमुळे शहरातील सफाई व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासन व पोलिसांकडून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

