भंडारा | प्रतिनिधी
भंडारा जिल्ह्यातील कोकणागड शिवारात मालमत्तेच्या वादातून जावयानेच आपल्या सासऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मृतकाचे नाव किशोर धर्मा कंगाले (वय ६५ वर्षे) असे असून, ते ९ जानेवारी २०२६ रोजी शेताकडे जात असल्याचे सांगून घरातून निघाले होते. मात्र त्यानंतर ते बेपत्ता झाले. दरम्यान, बेपत्ता होण्यापूर्वी मृतकाने फोनद्वारे आपल्या कुटुंबीयांना जावई अमीत लांजेवार व त्याचा एक मित्र आपल्याला मारहाण करत असल्याची माहिती दिली होती.
यानंतर कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली असता, ११ जानेवारी रोजी कोकणागड शिवारातील पुलाच्या सिमेंट पायलीत किशोर कंगाले यांचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच कारधा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.
आरोपींविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी मृतकाचा जावई अमीत लांजेवार व त्याच्या साथीदाराविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात मालमत्तेच्या वादातूनच हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कारधा पोलीस तपासात सक्रिय
सदर प्रकरणाचा पुढील तपास कारधा पोलीस स्टेशन करत असून, भंडारा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली आहेत. आरोपींच्या अटकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेमुळे कोकणागड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नात्यातील विश्वासाला काळीमा फासणाऱ्या या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.

