एसपींच्या आदेशानुसार संबंधित कर्मचाऱ्याचे निलंबन
भंडारा | प्रतिनिधी
भंडारा जिल्ह्यातील करडी पोलिस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असताना एका पोलिस कर्मचाऱ्याने थेट पोलिस स्टेशनच्या खोलीतच ओली पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित पोलिस कर्मचारी दारू पित असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामुळे पोलिस प्रशासनावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सदर पोलिस कर्मचारी पोलिस स्टेशनच्या एका खोलीत बसून मद्यप्राशन करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. विशेष म्हणजे हा प्रकार कर्तव्याच्या वेळेत आणि पोलिस स्टेशनच्या आवारात घडल्याने, कायद्याचे रक्षण करणारेच कायदा पायदळी तुडवत असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रकरणाची गंभीर दखल घेत भंडाऱ्याचे पोलिस अधीक्षक (SP) यांना विचारणा करण्यात आली. यावर त्यांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या वर्तनाला गंभीर गैरप्रकार मानत आहेत. तसेच प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेवरून राजकीय प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्याचे गृहखाते मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवत असताना अशा घटना घडत असल्याने, महाराष्ट्रातील पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नाना पटोले पुढे म्हणाले की, राज्यात गुंडगिरी, बेकायदेशीर सावकारी वाढत असून शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येत आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांना किडनी गहाण ठेवण्यापर्यंत मजल गेली आहे. ब्रह्मपुरीसारख्या भागातील घटना या शासनाच्या अपयशाचे उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
“राजा तसा त्याचा सैन्य” असे म्हणत त्यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
या घटनेमुळे भंडारा जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिस प्रशासनाने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
