नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी अलीकडेच आरएसएस-भाजप संघटनेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत काँग्रेसने त्यातून शिकण्याचा सल्ला दिला होता. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस फाउंडेशन डेच्या निमित्ताने पक्ष मुख्यालय इंदिरा भवन येथे राहुल गांधी आणि दिग्विजय सिंह यांची समोरासमोर भेट झाली.
सूत्रांच्या माहितीनुसार, दोघांची भेट होताच हस्तांदोलनाच्या वेळी राहुल गांधी यांनी दिग्विजय सिंह यांच्याकडे हसत-हसत, “काल तुम्ही थोडी बदमाशी केली,” अशी मिश्कील टिप्पणी केली. राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या नेत्यांमध्ये हशा पिकला. या वेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधीही उपस्थित होत्या.
काँग्रेस फाउंडेशन डेच्या कार्यक्रमानंतर पक्ष मुख्यालयात चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. या अनौपचारिक वातावरणात दिग्विजय सिंह आणि राहुल गांधी पुन्हा एकमेकांच्या जवळ आले. त्याच वेळी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा उपहासात्मक स्वरात ही टिप्पणी केल्याचे सांगितले जाते.
विशेष म्हणजे, याच्या अवघ्या २४ तास आधी दिग्विजय सिंह यांनी सोशल मीडियावर आरएसएस-भाजप संबंधांचे कौतुक करणारी पोस्ट शेअर केली होती. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा एक जुना फोटो शेअर करत संघटन शक्तीचे महत्त्व अधोरेखित केले होते.
काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीपूर्वी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये दिग्विजय सिंह यांनी लिहिले होते की, एका सामान्य आरएसएस स्वयंसेवकापासून ते देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा नरेंद्र मोदींचा प्रवास हा संघटनेच्या ताकदीचे उदाहरण आहे. “ही संघटनेची शक्ती आहे,” असे म्हणत त्यांनी ‘जय सियाराम’ असेही नमूद केले होते.
या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि दिग्विजय सिंह यांच्यातील हा मिश्कील संवाद काँग्रेसमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

