देवरी | गोंदिया न्यूज:
गोंदिया–भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पाडोले यांनी चार दिवसांपूर्वी देवरी तालुक्यातील शिरपूर चेकपोस्टला प्रत्यक्ष भेट देऊन अवैध वसुलीबाबत गंभीर सवाल उपस्थित केले होते. मात्र, इतक्या कमी कालावधीतही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आजही त्या ठिकाणी वसुली पूर्वीप्रमाणेच सुरू असल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
भेटीनंतरही परिस्थितीत बदल नाही
खासदारांच्या भेटीनंतर प्रशासनाकडून तात्काळ कारवाई होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र, चार दिवस उलटूनही वाहनचालकांना अडवून पैसे मागितले जात असल्याचे चित्र कायम असून, यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आधीच समोर आले होते गंभीर प्रकार
भेटीदरम्यानच अनेक गंभीर बाबी उघड झाल्या होत्या.
प्रश्न विचारताच काही कर्मचारी घटनास्थळावरून निघून गेले होते.
एक व्यक्ती स्वतःला ड्युटीवर असल्याचे सांगत होता, मात्र त्याच्याकडे ना वर्दी होती ना वैध ओळखपत्र.
तसेच, चेकपोस्टवरील कारवाईसाठी कोणताही लेखी आदेश किंवा कायदेशीर अधार सादर करण्यात आला नव्हता.
प्रशासनिक दुर्लक्षाचा आरोप
खासदारांच्या स्पष्ट सूचनांनंतरही परिस्थितीत बदल न झाल्याने हे केवळ निष्काळजीपणाचे नव्हे, तर प्रशासनिक दुर्लक्षाचे लक्षण आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. अशा प्रकारांवर वेळीच नियंत्रण न आणल्यास जनतेचा कायदा व व्यवस्थेवरील विश्वास ढासळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
“जनतेची लूट सहन केली जाणार नाही”
“चार दिवसांपूर्वी प्रत्यक्ष पाहणी करूनही जर परिस्थिती जैसे थे असेल, तर हे अत्यंत गंभीर आहे. जनतेला घाबरवून किंवा लुटून चालणारी कोणतीही यंत्रणा स्वीकारली जाणार नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे,” अशी ठाम भूमिका खासदार डॉ. प्रशांत पाडोले यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली आहे.

