युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या देशव्यापी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद
भंडारा | प्रतिनिधी
बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारने तात्काळ गांभीर्याने लक्ष द्यावे व पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा बँक कर्मचाऱ्यांनी दिला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू)च्या वतीने पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला भंडाऱ्यात मोठा प्रतिसाद मिळाला.
आज २७ जानेवारी २०२६ रोजी यूएफबीयू भंडारा युनिटच्या वतीने आयोजित आंदोलनात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्टाफ युनियन, नागपूर मंडळाचे उपाध्यक्ष सचिन वहिले तसेच गोंदिया रिजनचे रिजनल सेक्रेटरी अभय शहारे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यूएफबीयू ही नऊ प्रमुख बँक युनियन्सची संयुक्त संघटना असून, दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनी सांगितले की, २०१५ मध्ये दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुटी देण्याचे मान्य झाले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये दररोज ४० मिनिटे कामाचे तास वाढवून सर्व शनिवारी सुटी देण्याचा प्रस्ताव आयबीएने सरकारकडे पाठवला होता. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हा प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित असल्यानेच आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात विविध राष्ट्रीयकृत बँकांमधील कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान,
“पाच-दिवसीय बँकिंग आमचा हक्क आहे”,
“बँक कर्मचाऱ्यांचे शोषण थांबवा”,
“आमच्या आरोग्य, कुटुंब आणि सन्मानासाठी पाच-दिवसीय बँकिंग आवश्यक आहे”
अशा घोषणा देत सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला.
बँक कर्मचाऱ्यांचे वाढते कामाचे तास, कामाचा प्रचंड ताण, कुटुंबासाठी पुरेसा वेळ न मिळणे आणि खालावलेली जीवनमानाची गुणवत्ता या गंभीर मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. पाच दिवसांचा कामाचा आठवडा ही कोणतीही अतिरिक्त सुविधा नसून बँक कर्मचाऱ्यांचा मूलभूत हक्क असल्याचे आंदोलनकर्त्यांनी ठामपणे सांगितले.
सदर आंदोलन शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.

