नागपूर : लोकशाहीच्या सशक्ततेसाठी मतदानाचे महत्त्व अधोरेखित करत नागपूर शहरात यंदा एक अभिनव आणि लक्षवेधी उपक्रम राबवण्यात आला. नाताळ सणाचे औचित्य साधून सांताक्लॉजच्या वेशात युवकांनी शहरातील विविध भागांत फिरत नागरिकांना मतदानासाठी प्रेरित केले. नागपूर महापालिकेच्या वतीने सिस्टिमेटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन (स्वीप) कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम साकारण्यात आला असून, शहरातील तब्बल ४० ठिकाणी जनजागृती करण्यात आली.
या विशेष अभियानाचा औपचारिक प्रारंभ नागपूर महापालिकेच्या मुख्यालयात करण्यात आला. प्रशासकीय इमारतीच्या दालनात महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते स्वीप उपक्रमाची सुरुवात झाली. यावेळी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मतदार जनजागृती अधिक प्रभावी व्हावी यासाठी महापालिका मुख्यालय परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. याठिकाणी ‘मतदार जागृती ख्रिसमस ट्री’ उभारण्यात आला असून नागरिकांसाठी विशेष सेल्फी पॉईंटही तयार करण्यात आला होता. “मतदान हा लोकशाहीचा कणा आहे” आणि “संविधान सांगतोय – मतदान करा” अशा संदेशांनी परिसरात लोकशाहीचा उत्सव साजरा होताना दिसून आला.
शहरातील दहाही झोनमध्ये गर्दीच्या ठिकाणी सांताक्लॉजच्या वेषातील युवकांनी नागरिकांशी थेट संवाद साधत मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले. महापालिका मुख्यालयातून घोड्याच्या बग्गीतून सांताक्लॉजची मिरवणूक काढण्यात आली, ज्यामुळे नागरिकांचे विशेष लक्ष वेधले गेले. महिला मतदानामुळे सक्षम लोकशाही घडते आणि दिव्यांग मतदारांचा सन्मान हा लोकशाहीचा अभिमान आहे, असे संदेश फलकांद्वारे देण्यात आले.
चर्च परिसर, बाजारपेठा, प्रमुख चौक आणि वर्दळीच्या ठिकाणी सांताक्लॉजने भेट देत नागरिकांना मतदानासाठी आवाहन केले. लहान मुलांना चॉकलेट देऊन त्यांच्यामार्फत कुटुंबांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. या उपक्रमाला शहरवासीयांकडून मोठा आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
डॉ. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर आणि मंगळवारी या दहा झोन कार्यालयांमार्फत स्वीप कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. मतदान म्हणजेच लोकशाहीचा खरा उत्सव असून प्रत्येक नागरिकाने आपला हक्क बजावावा, असा ठाम संदेश या अभिनव अभियानातून देण्यात आला आहे.

