भंडारा | प्रतिनिधी भंडारा जिल्ह्यातील वनविभागाच्या अधिपत्याखालील अड्याळ जंगल परिसरात एका वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. पिलंद्री क्षेत्रातील कक्ष क्रमांक ३०२ आरएफ परिसरात ही घटना उघडकीस आली असून, प्राथमिक तपासात हा बछडा दीड ते दोन महिन्यांचा असल्याचे समोर आले आहे. वन्यजीवांमधील अधिवासाच्या वर्चस्वासाठी झालेल्या संघर्षातून हा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. वनकर्मचारी नियमित गस्तीवर असताना परिसरात वाघाच्या हालचाली दिसून आल्या. यानंतर वनरक्षक व वन्यजीव पथकाने परिसराची पाहणी केली असता सुमारे १०० मीटर अंतरावर वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी तसेच पशुवैद्यकीय तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामा करून मृत बछड्याला ताब्यात घेतले. पुढील तपासणीसाठी बछड्याला भिवखी येथील नर्सरीमध्ये हलविण्यात आले. प्राथमिक पशुवैद्यकीय तपासणीत बछड्याच्या शरीरावरील अवयव सुरक्षित असल्याचे समोर आले असून, कोणत्याही प्रकारची शिकार किंवा अवयव तस्करीची चिन्हे आढळून आलेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते, नर आणि मादी वाघांमधील अधिवासाच्या वर्चस्वासाठी होणाऱ्या संघर्षातून हा मृत्यू झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जंगलातील वाघांच्या अधिवासासाठी होणारी स्पर्धा अनेकदा बछड्यांसाठी धोकादायक ठरत असल्याचे वन्यजीव तज्ज्ञ सांगतात. मात्र, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी बछड्याचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, अंतिम अहवालानंतरच सत्य समोर येणार आहे. दरम्यान, अड्याळ जंगल परिसरात वाघांची वाढती हालचाल आणि मानवी वस्तीजवळ त्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने जंगलालगतच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले आहेत.
अड्याळ जंगलात खळबळ! अधिवासाच्या संघर्षात वाघ बछड्याचा बळी ?
Mukesh Kewat is a Maharashtra-based journalist working with VBN News. He reports on cyber crime, technology, public awareness campaigns, social issues, agriculture, and local governance, with a strong focus on credible and ground-level reporting.
Leave a Comment