पवनी | प्रतिनिधी
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात घडलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाच्या निर्घृण हत्या प्रकरणाचा पवनी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत छडा लावत आरोपीला अटक केली. या प्रकरणातील आरोपी हा मृत शिक्षकाच्या घरातच भाडेकरू म्हणून राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, किरकोळ वादातून संतापाच्या भरात त्याने ही हत्या केल्याची कबुली दिली आहे. मृत शिक्षकाची ओळख लीलाधर नथ्थू मोहरकर (वय ६०), रा. कोसरा, ता. पवनी अशी झाली आहे. तर अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव महेश विश्वकर्मा (वय ३२) असून तो मोहरकर यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होता. तसेच तो मिठाईचे दुकान चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
काय घडले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लीलाधर मोहरकर आणि महेश विश्वकर्मा हे काही खासगी कामानिमित्त पवनी येथील नजूल कार्यालयात गेले होते. काम आटोपल्यानंतर आरोपीने मोहरकर यांना “भुयार येथे काही काम आहे” असे सांगून मोटारसायकलवर सोबत नेले.निष्टी-भुयार मार्गावरील ठाणेगाव तलाव परिसरातील निर्जन ठिकाणी पोहोचल्यानंतर आरोपीने प्रथम त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र ते जिवंत असल्याचे लक्षात येताच त्याने जवळच पडलेला मोठा दगड उचलून त्यांच्या डोक्यावर वार केले. गंभीर दुखापतीमुळे मोहरकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दोन तासांत आरोपी गजाआड
घटनेची माहिती मिळताच पवनी पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनास्थळावरील पुरावे, संशयितांच्या हालचाली आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या दोन तासांत पवनी पोलीस स्टेशन चे ठाणेदार शिरीष भालेराव यांनी महेश विश्वकर्मा याला ताब्यात घेतले.कसून चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली देत हत्या केल्याचे मान्य केले.
हत्येमागील कारण काय?
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी महेश विश्वकर्मा याने सांगितले की, घरमालक लीलाधर मोहरकर हे त्याच्याशी वारंवार कठोर भाषेत बोलत आणि ओरडत असत. घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला होता. त्याच रागातून त्याने संतापाच्या भरात शिक्षकाची हत्या केली.
पवनी पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.