भंडारा | प्रतिनिधी
भंडारा शहरातील महात्मा ज्योतिबा फुले घाऊक भाजी मंडईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच घाऊक भाजी विक्रेत्यांविरुद्ध भंडारा नगर परिषद प्रशासनाने मोठी कारवाई करत त्यांच्या दुकानांना सील ठोकले. अनेक वेळा नोटीस देऊनही बाजार शुल्क न भरल्याने तसेच मंडईच्या नियमांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या नेतृत्वाखाली महसूल व जप्ती पथकाने पोलिस बंदोबस्तात ही मोहीम राबवली.
नगर परिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार, नजूल शीट क्रमांक ५४, प्लॉट क्रमांक २०/२००४ अंतर्गत सुमारे १.५० एकर जागेवर महात्मा ज्योतिबा फुले घाऊक भाजी मंडई कार्यरत आहे. या मंडईतील अतुल चंद्रभान मानकर, बंडू तानाजी बारापात्रे, किरण सुखदेव भेडे, मंगेश गौरीशंकर राऊत आणि दीपक कृष्णाजी पराते या व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील तरतुदीनुसार देय असलेले बाजार शुल्क दीर्घकाळ भरले नव्हते.
प्रशासनाने संबंधित व्यापाऱ्यांना १६ मे २०२५, १६ फेब्रुवारी २०२६ आणि २५ मार्च २०२६ रोजी नोटीस बजावत थकबाकी भरण्याचे निर्देश दिले होते. ३१ मार्च २०२६ पर्यंत अंतिम मुदत देऊनही शुल्क जमा न झाल्याने अखेर २९ जून २०२६ रोजी त्यांना मंडईतून निष्कासित घोषित करून दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान काही व्यापाऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मंडई परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नगर परिषदेच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने दुकानांसमोरील नाल्या खोदून दुकानांचा वापर बंद राहील, अशी व्यवस्था केली. दुकानांमधील काही साहित्यही जप्त करण्यात आले.
प्रशासनाने असेही स्पष्ट केले की, संबंधित व्यापाऱ्यांपैकी बंडू तानाजी बारापात्रे यांना बीटीबी मार्केटसाठी जागा लीजवर देण्यात आली होती. मात्र त्या जागेवर अनधिकृत दुकाने उभारून ती इतरांना विकल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचीही चौकशी सुरू असून भविष्यात आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल.
नगर परिषद प्रशासनाने इशारा दिला आहे की, सील करण्यात आलेल्या व्यापाऱ्यांनी पुन्हा मंडई परिसरात व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. शहरातील नियमबाह्य व अनधिकृत व्यवसायांवर पुढेही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, महात्मा ज्योतिबा फुले घाऊक भाजी मंडईचे अध्यक्ष महेंद्र धनीराम मेंढे यांनी व्यापारी आणि शेतकऱ्यांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. मंडईतील भाजीपाला खरेदी-विक्रीची प्रक्रिया नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू राहणार असून शेतकऱ्यांनी नियमितपणे माल आणावा, असे त्यांनी सांगितले.