भंडारा : आपल्या चपळाईने, तीक्ष्ण सूंघण्याच्या क्षमतेने आणि विलक्षण बुद्धिमत्तेने अनेक गुन्ह्यांची उकल करणारा भंडारा पोलिस दलातील लाडका श्वान ‘नॉटी’ याचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस विभागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
‘नॉटी’ हा केवळ एक श्वान नव्हता, तर पोलिस दलातील एक खरा शिपाई होता. त्याने आपल्या सेवाकाळात अत्यंत प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत अनेक गुन्ह्यांच्या तपासात मोलाची भूमिका बजावली. त्याच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे तो पोलिस दलात विशेष ओळख निर्माण करू शकला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘नॉटी’ने तब्बल १५ गुन्ह्यांची यशस्वी उकल करण्यात मोलाचे योगदान दिले असून, ३३ गुन्ह्यांमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. त्याच्या या कार्यामुळे अनेक गुन्हेगारांना गजाआड करण्यात पोलिसांना मोठी मदत झाली.
क्रीडा क्षेत्रातही ‘नॉटी’ने आपली छाप उमटवली होती. २०१८ आणि २०१९ साली नागपूर येथे झालेल्या परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत त्याने सलग प्रथम क्रमांक पटकावला होता. तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत भंडारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत त्याने जिल्ह्याचा मान उंचावला होता.
‘नॉटी’ने पुणे येथे ९ महिन्यांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण करून पोलिस दलात दाखल झाला होता. त्यानंतर त्याने आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये सहभाग घेत पोलिस दलाची ताकद वाढवली.
आज ‘नॉटी’ला शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. पोलिसांकडून ‘शोक सलामी’ देत या शूर शिपायाला आदरांजली वाहण्यात आली. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी पुष्पचक्र अर्पण करून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
‘नॉटी’च्या निधनामुळे पोलिस दलात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्याची उणीव कायम जाणवत राहील. त्याच्या निस्वार्थ आणि समर्पित सेवेला संपूर्ण भंडारा पोलिस दलाचा कडक सलाम.

