भंडारा –
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व यंत्रणांना निधी उपलब्ध करून देण्यात येतो. जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील विकासासाठी विकासात्मक काम करण्यासाठी जिल्हयातील सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा.तसेच .2026-2027 या आर्थिक वर्षातील प्राप्त निधीचा योग्य नियोजनाने विहित वेळेत सर्व विभागांनी खर्च करून कामे करावी असे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले.
या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा कविता उईके, खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार नाना पटोले, आमदार राजू कारेमोरे, आमदार परिणय फुके, यांच्यासह जिल्हाधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन ,मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साळवे उपस्थित होते.
या नियोजन समितीच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत शुद्ध ठेवणे या मुद्द्यावर चर्चा झाली. खासदार श्री.पडोळे यांनी मांडलेल्या मुददयावर नाग नदीने होणाऱ्या प्रदूषणाबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अहवाल द्यावा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी महानगरपालिका नागपूर आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र देऊन पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री भोयर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
वैनगंगा-नळगंगा जोड प्रकल्पातून भंडारा जिल्ह्याला शुद्ध पाणी मिळण्यासाठीचा विकास आराखडा तयार करण्याची चर्चा देखील यावेळी झाली.
शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्त्यांची मोठी आवश्यकता असून जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेमधून पाणंद रस्त्यांची कामे जलद गतीने सुरू व्हावी, त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय मान्यता जिल्हाधिका-यांनी अधिनस्त यंत्रणांना देण्याचे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले.
यावेळी झालेल्या चर्चेत खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी अनेक मुद्दे मांडले. त्यावर ही पालकमंत्री श्री.भोयर यंत्रणा निर्देश दिले.
जिल्हा ग्रंथालयाची आज सकाळी पालकमंत्री श्री भोयर यांनी पाहणी केली. जिल्हयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या चांगले वातावरण निर्मितीसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा देण्यासाठी तसेच अभ्यासू वातावरण् देण्यासाठी ग्रंथालय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले.जिल्हयात 201 ग्रंथालय असुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयांची पाहणी करून त्यादृष्टीने आराखडा सादर करण्याची निर्देश त्यांनी यावेळी दिली.
जिल्हा ग्रंथालयासाठी 50 लक्ष रुपयांच्या निधीमधून रंगरंगोटी, साफसफाई आणि विद्यार्थ्यांसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था,तसेच परिक्षेसाठी उत्तम संदर्भ साहीत्य खरेदी करण्यात यावी असेही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुचित केले.
जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेला जिल्हा पाहता येथील पर्यटनाबाबत जनजागृती आवश्यक असल्याचे व त्या अनुषंगाने यंत्रणांनी कार्यवाही करण्याची ही पालकमंत्री निर्देश दिले.
शिक्षण विभागातर्फे शासकीय शाळा ह्या मॉडेल स्कूल बनवण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने आराखडा सादर करावा.
15 जानेवारी अखेरपर्यंत जिल्हा नियोजन निधीतील 52% निधी खर्च झालेला आहे .सर्व अधिनस्त यंत्रणांनी निधीचे नियोजन करून निधी विहित वेळेत खर्च करण्याचे देखील त्यांनी सांगितले. ज्या यंत्रणांना निधी खर्च शक्य होत नाही त्या यंत्रणांनी जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली तो निधी पुनर्विनियोजन करावा व आवश्यक त्या कामासाठी खर्च करण्याचे निर्देश श्री.भोयर यांनी आज दिले.
बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा प्रशासनातर्फे क वर्ग कर्मचाऱ्यांचे गोपनीय उत्तम पद्धतीने लिहिण्यासाठी महा ई पार प्रणाली आणि आणि भंडारा सेवा संवाद या जिल्हा प्रशासनाचे अधिकृत व्हाट्सअप चॅटबोटचा शुभारंभ पालकमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला.

