चंद्रपूर : जीवनाला खऱ्या अर्थाने समृद्ध करणारा आनंद कोणता असेल, तर तो रामकथेचा आहे, असे भावनिक उद्गार आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. “महाराष्ट्राचा अर्थमंत्री म्हणून मी अनेक नामवंत उद्योगपतींना भेटलो; परंतु त्यांच्या चेहऱ्यावरही जो समाधानाचा प्रकाश दिसला नाही, तो प्रकाश आज पूज्य राजन महाराजांची रामकथा ऐकताना एका साध्या, गरीब महिलेच्या चेहऱ्यावर उमटलेला पाहायला मिळाला. हा आनंद भौतिक संपत्तीपेक्षा कितीतरी मोठा असून मन आणि जीवन दोन्ही समृद्ध करणारा आहे,” असे ते म्हणाले.
लखमापूर धाम, चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित भव्य श्रीरामकथेचा गुरुवारी (दि. २२ जानेवारी) महाआरतीने दिमाखदार समारोप झाला. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या रामकथेला गेल्या नऊ दिवसांत प्रचंड प्रतिसाद लाभला असून संपूर्ण चंद्रपूरसह विदर्भाचे वातावरण राममय झाले होते.
समारोपप्रसंगी बोलताना आ. मुनगंटीवार यांनी रामभक्तीची ऊर्जा, रामनामाची ताकद आणि रामकथेचा समाजावर होणारा सकारात्मक परिणाम अत्यंत प्रभावी शब्दांत मांडला. “जगातील कोणतेही टॉनिक जितकी शक्ती देत नाही, त्याहून अधिक ऊर्जा रामधून देते. ८१ वर्षांची एक ज्येष्ठ महिला १८ वर्षांच्या युवतीप्रमाणे रामधून ऐकताना नृत्य करत होती, हे दृश्य पाहून मन आनंदाने भरून आले,” असे सांगत त्यांनी पूज्य राजन महाराजांचे मनापासून आभार मानले.
“जिंदगी जब तक रहेगी फुरसत ना होंगी काम से,
कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से”
या ओळी उद्धृत करत त्यांनी रामकथा ही केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजाला योग्य दिशा देणारी मूल्यव्यवस्था असल्याचे स्पष्ट केले.
दररोज हजारोंची उपस्थिती
मकर संक्रांतीपासून सुरू झालेल्या या श्रीरामकथेत दररोज हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. पूज्य राजन महाराजांच्या ओजस्वी, रसाळ आणि अमृतमय वाणीने श्रीरामांच्या जीवनातील आदर्श, कर्तव्य, त्याग आणि करुणेचे संदेश श्रोत्यांच्या मनात खोलवर रुजवले.
सामाजिक व सांस्कृतिक जाणिवांचा जागर
रामकथा ही समाजाला एकत्र बांधणारी शक्ती आहे, हा विचार या आयोजनातून प्रत्यक्षात उतरल्याचे दिसून आले. राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक व सांस्कृतिक मूल्ये जपण्याचा आमदार मुनगंटीवार यांचा दृष्टिकोन या उपक्रमातून ठळकपणे जाणवला. विशेष म्हणजे ते सपत्नीक दररोज कथास्थळी उपस्थित राहून भाविकांमध्ये प्रेरणा निर्माण करत होते.
भक्तिभावाचे वातावरण
समारोपाच्या दिवशी झालेल्या महाआरतीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध समाजघटकांच्या सहभागातून झालेली आरती सामाजिक ऐक्याचे सुंदर प्रतीक ठरली. भव्य व्यासपीठ, सुयोग्य नियोजन आणि मनोहारी विद्युत रोषणाईमुळे चांदा क्लब ग्राऊंडवर दिव्य आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.
लाईव्ह प्रक्षेपणामुळे राज्यव्यापी लाभ
या श्रीरामकथेचे थेट लाईव्ह प्रक्षेपण सुरू असल्याने राज्यभरातील रामभक्तांना घरबसल्या पूज्य राजन महाराजांच्या अमृतवाणीचा लाभ मिळाला. त्यामुळे चंद्रपूरची ही रामकथा स्थानिक मर्यादेत न राहता राज्यव्यापी आध्यात्मिक उत्सव ठरली.
सुवर्णाक्षरी नोंद
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही भव्य श्रीरामकथा चंद्रपूरच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाणारी ठरली असून, या भक्तिरसाचा प्रभाव दीर्घकाळ समाजमनाला प्रेरणा देत राहील, असा विश्वास भाविकांनी व्यक्त केला.

