भंडारा, दि. 16 फेब्रुवारी 2026 : भंडारा जिल्ह्यातील सुरबोडी गावातील शेतकऱ्यांचे तब्बल 94 टक्के शेती अधिग्रहित होऊनही आजतागायत गावाचे पुनर्वसन न झाल्याने गावकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द धरण उभारणीमुळे गावातील मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली गेली, परंतु पर्यायी जमीन, रोजगार आणि मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अद्याप कागदावरच राहिले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शेती हिरावल्याने उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाले असून गावात रोजगाराच्या संधीही उपलब्ध नसल्याने कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा, हा प्रश्न प्रत्येक घरासमोर उभा आहे.
गावकऱ्यांनी सांगितले की 2011 पासून पुनर्वसनाच्या मागणीसाठी शासनाकडे सतत पत्रव्यवहार केला गेला, विविध पातळ्यांवर बैठका झाल्या, आंदोलने करण्यात आली; तरीही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. महिलांनी आर्त हाक देत आम्हाला कोणत्याही योजनेचे पैसे नकोत, परंतु सन्मानाने जगण्यासाठी पुनर्वसन करा, अशी मागणी केली आहे. धरणाच्या प्रकल्पाची किंमत वर्षानुवर्षे प्रचंड वाढत गेली, मात्र पुनर्वसनाचा प्रश्न मात्र मार्गी लागला नाही, ही खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. अनेक वेळा आंदोलन करूनही प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद मिळाला नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
स्थानिक पातळीवर हा प्रश्न वेळोवेळी उपस्थित करण्यात आला असून आमदार नरेंद्र भोंडेकर यांनीही विधानसभेत या विषयावर प्रश्न उपस्थित केला असल्याचे सांगितले जाते. अनेकदा बैठका घेण्याचा प्रयत्न करूनही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतला नाही, असा आरोपही त्यांनी केला. पालकमंत्री हे केवळ निधी वाटपासाठी नसून जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी जबाबदार असतात, असे स्पष्ट करत हा मुद्दा आगामी अधिवेशनात पुन्हा जोरदारपणे मांडला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी न लागल्यास धरणाच्या पाण्यात जलसमाधी घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिल्याने प्रशासनासमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गावकऱ्यांचा संयम सुटू लागला असून न्यायासाठीची त्यांची प्रतीक्षा दिवसेंदिवस लांबत चालली आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून पुनर्वसनाचा मार्ग मोकळा करावा, रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात आणि विस्थापित कुटुंबांना सन्मानाने जगण्याची संधी द्यावी, अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे.