भंडाऱ्यात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १२ लाख ६५ हजारांची एमडी जप्त…

VBN News online news portal
By
Mukesh Kewat
VBN News online news portal
Reporter / Correspondent
Mukesh Kewat is a Maharashtra-based journalist working with VBN News. He reports on cyber crime, technology, public awareness campaigns, social issues, agriculture, and local governance, with...
- Reporter / Correspondent
1 View
3 Min Read
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई — भंडाऱ्यात एमडी ड्रग्जसह लाखोंचा मुद्देमाल जप्त.

भंडारा : भंडारा शहरात पुन्हा एकदा अमली पदार्थांचा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने धडक कारवाई करत तब्बल १२ लाख ६५ हजार रुपये किमतीची एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त केली आहे. या कारवाईत रोख रक्कम व अन्य साहित्य असा एकूण १३ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नागपूर येथील आरोपी कपिल गंगाधर खोब्रागडे याला अटक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिस विभागात प्रभारी अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्याच मोठ्या धाडीत एवढ्या मोठ्या प्रमाणात एमडी जप्त झाल्याने जिल्ह्यात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा शहरातील आंबेडकर वॉर्ड परिसरात एक व्यक्ती एमडी ड्रग्जची विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी संशयितावर गोपनीय पाळत ठेवून सापळा रचला.

समाज भवनाजवळील परिसरात संशयित इसमाची तपासणी करण्यात आली असता त्याच्याकडून तब्बल ६३.२१० ग्रॅम एमडी पावडर आढळून आली. पोलिसांनी तत्काळ आरोपी कपिल खोब्रागडे याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.

आरोपीवर नागपूरमध्येही गुन्हे

पोलिस तपासात आरोपी कपिल खोब्रागडे याच्यावर नागपूर येथे देखील विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून एमडी ड्रग्जचे जाळे भंडारा जिल्ह्यात किती खोलवर पसरले आहे, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

खासदारांनी उपस्थित केला होता मुद्दा

भंडारा जिल्ह्यात एमडी ड्रग्जची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा मुद्दा काही दिवसांपूर्वी एका खासदारांनी सार्वजनिकरीत्या उपस्थित केला होता. जिल्ह्यात युवकांमध्ये वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे त्या आरोपांवर शिक्कामोर्तब होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

दोन वर्षांनंतर मोठी कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेकडून गेल्या काही वर्षांत अमली पदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई झाली नसल्याची चर्चा सुरू होती. अशातच प्रभारी पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव यांच्या नेतृत्वाखाली पहिल्याच मोठ्या धाडीत लाखोंचा मुद्देमाल जप्त झाल्याने पोलिस विभागातही विविध चर्चांना उधाण आले आहे.

या प्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. पोलिसांनी जिल्ह्यातील अमली पदार्थ पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढवली आहे.

Share This Article
VBN News online news portal
Reporter / Correspondent
Follow:
Mukesh Kewat is a Maharashtra-based journalist working with VBN News. He reports on cyber crime, technology, public awareness campaigns, social issues, agriculture, and local governance, with a strong focus on credible and ground-level reporting.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Pages